- 1 देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
- 2 मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
- 3 परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
- 4 परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
- 5 तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
- 6 परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
- 7 तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
- 8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.
- 9 परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
- 10 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
- 11 तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात. तू किती महान आहेस हे ते सांगतात.
- 12 म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते. तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.
- 13 परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील.
- 14 जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो. जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.
- 15 परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
- 16 परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
- 17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
- 18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो.
- 19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो. तो त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतो आणि त्यांना वाचवतो.
- 20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
- 21 मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
Psalms 145
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 145