wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


रूथ धडा 2
  • 1 बेथलेहेममध्ये बवाज नावाचा एक श्रीमंत गूहस्थ राहात असे. तो अलीमलेखच्या कुळातला म्हणजे नामीचा जवळचा नातलगच होता.
  • 2 एकदा रूथ नामीला म्हणाली,”मी आज शेतावर जाऊ का? कोणी दयाळू माणूस भेटला तर त्याच्या शेतात राहिलेले धान्य वेचून आणीन”
  • 3 नामीने तिला बरं म्हणून अनुमती दिली.रूथ शेतावर गेली कापणी करणाऱ्यांच्या मागे फिरत उरले सुरले धान्य ती वेचू लागली योगायोग असा की हे शेत अलीमलेखाचा नातेवाईक बवाज याच्याच मालकीचे होते.
  • 4 थोडया वेळाने बवाज बेथलेहेमहून शेतावर आला. परमेश्वर तुमच्याबरोबर असो असे म्हणून त्याने आपल्या मजुरांचा समाचार घेतला. मजुरांनीही परमेश्वर तुमचे भले करो असे म्हणून त्याचे उलट अभिष्टचिंतन केले.
  • 5 मजुरांवर देखरेख करणाऱ्या मुकादमाजवळ मग बवाजने ही मुलगी कोण म्हणून चौकशी केली.
  • 6 मुकादम म्हणाला, “नामीबरोबर मवाबातून आलेली तरूणस्त्री ती हीच.
  • 7 “ती आज सकाळी इथे आली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागून धान्य वेचायची परवानगी तिने मागितली. सकाळपासून ती येथे आहे.तिचे घर त्या तिकडे आहे.”
  • 8 हे ऐकून बवाज तिला म्हणाला, “मुली, माझ्या शेतात राहून तुझ्यासाठी धान्य गोळा कर. दुसऱ्या कोणाच्या शेतावर जायची तुला गरज नाही. इथल्या कामावरच्या बायकांना धरून.
  • 9 त्यांच्या मागोमाग जा. तुला त्रास द्यायचा नाही असे मी माझ्या माणसांना बजावले आहे. तहान लागेल तेव्हा या लोकांसाठी पाणी भरून ठेवले आहे त्यातूनच पी.”
  • 10 रूथने यावर बवाजला वाकून अभिवादन केले अणि ती म्हणाली, “माझ्याकडे तुमचे लक्ष गेले हे आश्चर्यच म्हणायचे, मी खरे तर परकी बाई पण तुम्ही माझ्यावर मोठीच दया केलीत.”
  • 11 बवाज तिला म्हणाला, “तू आपल्या सासूला कशी मदत करतेस हे मी ऐकले आहे. आपला नवरा वारल्यावरही तू तिला धरून राहिली आहेस. आपले आई वडील आपला देश सोडून तू इथे, या देशात आलीस.
  • 12 तुझ्या या वागणुकीचे तुला चांगले फळ मिळेल. इस्राएलाचा परमेश्वर देव तुझ्यावर कृपादृष्टी ठेवील. त्याच्या आश्रयालातू आली आहेस तेव्हा तो तुझा सांभाळ करील.”
  • 13 रूथ म्हणाली, “माझ्यावर तुमची मोठीच कूपा आहे. मी निव्वळ एक दासी, तुमच्या नोकराएवढीही माझी लायकी नाही. असे असूनही गोड बोलून तुम्ही माझ्या मनावर फुंकर घातली आहे.”
  • 14 जेवायची वेळ झाली तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “चल, थोडी भाकर आमच्या बरोबर खाऊन घे. या रसात बुडवून खा.”तेव्हा रूथ सर्व मजुरांबरोबर बसली. बवाजने तिला हुरडाही दिला. तिने पोटभर खाल्ले. अगदी ताटात उरेपर्यंत खाल्ले.
  • 15 मग ती उठली आणि राहिलेले धान्य गोळा करू लागली.बवाज आपल्या मजुरांना म्हणाला, “कापलेल्या पेंढ्या मधूनही रूथला धान्य गोळा करू द्या आडकाठी करू नका.
  • 16 तसेच मुद्दाम तिच्यासाठी दाणे भरलेली कणसेही टाकत जा. तिला हवे तेवढे घेऊ द्या,पुरे म्हणू नका.”
  • 17 रूथ संध्याकाळपर्यंत शेतात होती. गोळा केलेल्या धान्याची तिने झोडणी केली. भुश्श्यातून दाणे बाहेर काढले. अर्धा बुशेले सातू निघाले.
  • 18 घरी आणून तिने ते सासूला दाखवले. उरलेले दुपारचे जेवणही तिला दिले.
  • 19 सासूने तिला विचारले, “कुठून एवढे धान्य गोळा केलेस? काम कोठे केलेस? तुझी दखल घेणाऱ्याचे भले होवो.”मग रूथने तिला सर्व हकीकत सांगितली. बवाज नावाच्या माणसाकडे आपण काम केल्याचे तिने सांगितले.नामी सुनेला म्हणाली,”परमेश्वर त्याचे भले करो. मेलेल्यांना आणि हयात असलेल्यांना दया दाखवायचे त्याने चालू ठेवलेले
  • 20 बवाज आपल्या नातेवाईकांपैकी असून आपला त्राता असल्याचे तिने रूथला सांगितले.
  • 21 तेव्हा रूथ म्हणाली,”त्याने मला पून्हा यायला सांगितले आहे. कापणी होईपर्यंत मजुरांबरोबर राहून धान्य गोळा कर असे तो म्हणाला आहे.”
  • 22 नामी आपल्या सुनेला म्हणाली, “त्याच्याच कडल्या बायकांबरोबर तू शेतात गेलीस तर बरे. इतर कुठे गेलीस तर पुरूषांचा तुला उपद्रव होईल.”
  • 23 अशा प्रकारे रूथ बवाजकडे तिथल्या बायकांबरोबर काम करत राहिली. सातूचा हंगाम संपेपर्यंत तिने धान्य गोळा केले. पुढे गव्हाच्या हंगामातही ती तेथे जात राहिली. अशा तऱ्हेने ती आपल्या सासूबरोबर म्हणजे नामी बरोबरच राहिली.