wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


00:00/00:00
2 शमुवेल धडा 6
  • 1 दावीदाने पुन्हा इस्राएलमधून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले.
  • 2 त्यासह तो पवित्र करार कोश यरुशलेमला आणण्यासाठी यहूदातील बाला येथे गेला. देवाची उपासना करायची असली म्हणजे हा कोश जेथे असेल तेथे लोकांना जावे लागे. हा पवित्र करार कोश म्हणजे देवाचे सिंहासन आहे. करुब देवदूतांच्या प्रतिकृती त्यावर होत्या. त्यावर परमेश्वर राजासारखा बसलेला होता.
  • 3 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.
  • 4 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून हा पवित्र कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो पवित्र कोशापुढे चालू लागला.
  • 5 तेव्हा देवदाराच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत कोशापुढे चालू लागले.
  • 6 ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला.
  • 7 पण परमेश्वराचा त्याच्यावर कोप होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करुन त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा करार कोशाशेजारीच उज्जा गतप्राण झाला.
  • 8 या घटनेमुळे दावीद फार खिन्न झाला आणि त्याने या जागेचे नाव “पेरेस-उज्जा” म्हणजेच “उज्जाला शासन” असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.
  • 9 मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला. तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?”
  • 10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती आणि त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन गथच्या ओबेद-अदोम याच्या घरी ठेवला.
  • 11 तिथे तो कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.
  • 12 पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद अदोमच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कारण पवित्र करार कोश तेथेच आहे.” तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता.
  • 13 कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचा बळी दिला.
  • 14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नाच करत होता.
  • 15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते.
  • 16 शौलाची मुलगी मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्यापुढे नाचत. उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला खेद वाटला. दावीद स्वत:चे हसे करुन घेत आहे असे तिला वाटले.
  • 17 या करार कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यात योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली.
  • 18 हे झाल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या वतीने आशीर्वाद दिले.
  • 19 शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषांस त्याने भाकरीचा तुकडा, किसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.
  • 20 दावीद मग घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्याला गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला मान राखला नाही. नोकरा चाकरांमोर, दासी समोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले कपडे काढलेत.“
  • 21 तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना वगळून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार.
  • 22 मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल आभिमान वाटतो.”
  • 23 शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.