wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 28
  • 1 राजाने इस्राएल लोकांमधील सर्व पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांना त्याने यरुशलेमला येण्यास सांगितले. घराण्यांचे प्रमुख, राजाचे सेनापती, अधिकारी, अंमलदार, कोठारांची गुरांची, राजपुत्रांची जबाबदारी उचलणारे राजाचे सर्व महत्वाचे अधिकारी, शूर वीर आणि लढवय्ये या सर्वांना त्याने बोलावले.
  • 2 राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा करारकोश ठेवण्यासाठी एक विश्रामधाम बांधावे असा माझा मानस होता. देवाच्या पादासनासाठी एक मंदिर बांधायचा माझा विचार होता. त्या मंदिराच्या इमारतीचा आराखडाही मी तयार केला.
  • 3 पण देव मला म्हणाला, ‘नाही दावीदा, तू माझ्यासाठी मंदिर उभारु नयेस. तू एक लढवय्या असूत तू अनेकांना ठार मारले आहेस.’
  • 4 “इस्राएलचा परमेश्वर देव याने इस्राएलच्या बारा घराण्यांची धुरा सांभाळण्यासाठी यहूदा घराण्याची निवड केली. आणि मग त्यातून परमेश्वराने माझ्या वडीलांच्या घराण्याला अग्रणी केले. आता या कुटुंबातून देवाने माझी इस्राएलचा कायमचा राजा म्हणून निवड केली. मला इस्राएलचा राजा कराचे अशी परमेश्वराची इच्छा होती.
  • 5 देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून परमेश्वराने शलमोनला माझा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. पण खरे पाहता इस्राएल हे परमेश्वराचेच राज्य आहे.
  • 6 परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, माझे मंदिर आणि त्या भोवतालचे आवार याची उभारणी तुझा पुत्र शलमोन याच्या हातून होईल. कारण पुढे राजासनावर तो बसणार आहे. त्यासाठी मी त्याची पुत्र म्हणून निवड केली आहे आणि मी त्याचा पिता आहे.
  • 7 माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन करायला शलमोनाने सुरवात केली आहे. त्याने कसोशीने हे आज्ञापालन असेच पुढे चालू ठेवले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.”
  • 8 दावीद म्हणाला, “तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. तरच या सुपीक भूमीवर तुम्ही नांदाल. तुमच्यानंतर तुमचे वंशजही इथेच निर्वेधपणे राहू शकतील.
  • 9 “आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंत:करणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो.
  • 10 शलमोन, परमेश्वराने त्याचे पवित्र स्थान म्हणजे मंदिर बांधून घेण्यासाठी तुझी निवड केली आहे हे चांगले लक्षात ठेव. हिंमत बाळग आणि हे कार्य पूर्णत्वाला ने.”
  • 11 दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता.
  • 12 मंदिराच्या सर्व भागांची योजना दावीदाने केली होती, ती त्याने शलमोनाला दिली. मंदिरा भोवतीचे अंगण आणि इतर बांधकामे यांच्या योजना दावीदाने त्याला दिल्या. मंदिराच्या कोठाराच्या खोल्या आणि मंदिराची पवित्र उपकरणे ठेवण्यासाठी असलेली भांडारगृहे यांचेही नकाशे त्यात होते.
  • 13 याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती दावीदाने शलमोनाला दिली तसेच मंदिरातील सेवेच काम आणि त्यात वापरायची उपकरणे याबद्दलही त्याने शलमोनाला सांगितले.
  • 14 मंदिरातील सर्व वस्तूंसाठी किती सोने-चांदी वापरायची हे सांगितले.
  • 15 सोन्या चांदीचे दिवे आणि दिवठणी यांचे नमुने केलेले होते. त्यातील प्रत्येक दिवा आणि दिवठण यासाठी नेमके किती चांदीसोने वापरायचे याची दावीदाने शलमोनाला कल्पना दिली. वेगवेगळ्या ठिकाणी गरजेप्रमाणे या दीपमाळा वापरायच्या होत्या.
  • 16 पवित्र भाकरी ठेवायच्या मेजासाठी किती सोने - चांदी लागेल त्याचे वजन शलमोनाला दावीदाने सांगितले.
  • 17 काटे, कटोरे, सुरया यांना लागणारे निर्भेळ सोने, तबकांसाठी लागणारे सोने-चांदी यांचे वजन दिले.
  • 18 धूप जाळण्यासाठी जी वेदी करायची तिला लागणारे सोने किती हे ही त्याने सांगितले. परमेश्वराच्या करारकोशावर जे करुब देवदूत आपले पंख पसरुन धरत होते त्यासह असलेले दयासन म्हणजेच देवाचा रथ याचा नमुनाही शलमोनाला त्याने दिला. हे करुब सोन्यात करायचे होते.
  • 19 दावीद म्हणाला, “हे सर्व नमुने परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे लिहून ठेवलेले आहेत. त्या नमुन्यांतील सर्व गोष्टी परमेश्वराने मला समजावून सांगितलेल्या आहेत.”
  • 20 दावीद शलमोनाला पुढे म्हणाला, “धीर धर आणि न भिता या कामाची सांगता कर. प्रत्यक्ष परमेश्वर, माझा देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा घाबरु नको. सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला साथ देईल. ही साथ तो अर्धवट सोडणार नाही. मंदिराचे बांधकाम तू पूर्णत्वाला नेशील.
  • 21 याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. ते देवाच्या मंदिराच्या कामाला सज्ज आहेत. सर्वप्रकारच्या कामासाठी कुशाल कारागिर तुझ्याबरोबर आहेत. तुझी प्रत्येक आज्ञा अधिकारी आणि सर्व लोक मानतील.”