wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


एज्रा / Ezraधडा 4
  • 1 त्या भागातील बरेच लोक यहूदा आणि बन्यामीन यांचे विरोधक होते. बंदिवासातून आलेले लोक परमेश्वरासाठी मंदिर बांधत आहेत हे या विरोधकांना कळले तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हालाही तुमच्या बांधकामात मदत करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही या देवाला मदतीसाठी विनवितो. अश्शूरचा राजा एसर हद्दोन याने आम्हाला इकडे आणल्यापासून तुमच्या या देवासाठी आम्ही होमार्पण करीत आलो आहोत.”
  • 2
  • 3 पण जरुब्बाबेल, येशूवा आणि इस्राएलची इतर वडीलधारी मंडळी त्यांना म्हणाली, “आमच्या या मंदिराच्या बांधकामात तुमची मदत चालणार नाही. प्रभूचे, इस्राएलच्या परमेश्वराचे मंदिर फक्त आम्हीच बांधू शकतो. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे.”
  • 4 याचा त्या लोकांना फार राग आला. त्यांनी मग, यहुद्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना नाऊमेद करुन मंदिर बांधण्यापासून परावृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
  • 5 यहूद्यांचा मंदिर बांधावयाचा संकल्प सिध्दीला जाऊ नये म्हणून विरोधकांनी पैसे चारुन मंत्र्यांना फितवले. त्या मंत्र्यांनी यहूद्यांचा मंदिर बांधण्याचा बेत बंद पाडण्यासाठी सतत कारस्थाने केली. पारसाच्या कोरेश राजाची कारकीर्द संपून दरायावेश राजा सत्तेवर येईपर्यंत असेच चालले.
  • 6 त्या विरोधकांनी यहुद्यांना थांबवण्यासाठी पारसाच्या राजाला सुध्दा पत्र लिहिले; ज्यावेळी अहश्वेरोश पारसाचा राजा झाला त्यावेळी त्यांनी हे पत्र लिहिले.
  • 7 पुढे अर्तहशश्त पारसाचा राजा झाल्यावर पुन्हा या विरोधकांपैकी काहींनी यहूद्यांविरुध्द कागाळ्यांचे आणखी एक पत्र त्याला लिहिले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे साथी यांनी हे पत्र लिहिले. हे पत्र अरामी भाषेत व अरामी लिपीत लिहिले होते.
  • 8 यानंतर मुख्य मंत्री रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरुशलेम येथील लोकांविरुध्द अर्तहशश्त राजाला पत्र पाठवले. पत्राचा मजकूर असा होता:
  • 9 मुख्य अधिकारी रहूम चिटणीस शिमशय आणि टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी, यांच्यावरील महत्वाचे अधिकारी यांच्याकडून
  • 10 शिवाय, आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोन आणि फरात नदीच्या पश्र्चिम प्रदेशात आणून वसवलेले लोक यांच्याकडून,
  • 11 राजा अर्तहशश्त यास,फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक.
  • 12 राजा अर्तहशश्त यास आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की तुम्ही पाठवून दिलेले यहूदी कैदी येथे पोचले आहेत. ते आता पुन्हा नव्याने नगर बांधत आहेत. यरुशलेम हे वाईट शहर आहे इथल्या लोकांनी नेहमीच इतर राजांविरुध्द उठाव केला आहे. आता हे यहुदी पाया घालणे, तटबंदीची भिंत बांधणे अशी कामेकरत आहेत.
  • 13 राजा अर्तहशश्त, यरुशलेमभोवतीचा हा कोट पुरा झाला की हे लोक तुमच्या सन्मानार्थ कर, जकात वगैरे भरणे थांबवतील व त्यामुळे तुमचा मोठा तोटा होईल हे तुमच्या ध्यानी यावे.
  • 14 राजाच्या बाबतीत आमचे म्हणून एक कर्तव्य आहे; वरील गोष्टी घडू नयेत असे आम्हाला वाटते म्हणून माहितीखातर आम्ही हे पत्र लिहीत आहोत.
  • 15 राजा अर्तहशश्त, तुमच्या आधी जे राजे होऊन गेले त्यांच्या कामकाजाचे वृत्तांत तुम्ही पहावा असे आम्ही सुचवू इच्छितो. त्या बखरीवरुन तुमच्या लक्षात येईल की यरुशलेमने इतर राजाविरुध्द उठाव करुन त्यांना नेहमीच जेरीला आणले आहे पूर्वापार हे चालत आलेले आहे, म्हणून यरुशलेम धुळीला मिळाले.
  • 16 राजा अर्तहशश्त, आम्ही सांगू इच्छितो की हे नगर आणि त्याभोवतीचा कोट बांधून पुरा झाला की फरात नदीच्या पश्रिमेकडील भागावरचा तुमचा अंमल संपुष्टात येईल.
  • 17 यावर राजा अर्तहशश्तने पुढील उत्तर पाठविले:मुख्य राजमंत्री रहूम, लेखक शिमशय आणि शोमरोन व फरात नदीच्या पश्रिृमेला राहणारे त्यांच्याबरोबरचे लोक यांस:
  • 18 तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करुन मला वाचून दाखवण्यात आला.
  • 19 माझ्या आधीच्या राजांच्या कारभाराचे वृत्तांत काढून पाहायचा मी आदेश दिला. त्यावरुन असे लक्षात आले की यरुशलेमला राजाच्या विरुध्द बंड करणाऱ्यांचा मोठा इतिहास आहे. फितुरीचे आणि बंडाचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत.
  • 20 यरुशलेम आणि फरात नदीच्या पश्रिम प्रदेशावर राज्य करणारे पराक्रमी राजे होऊन गेले. त्या राजांना लोक कर, जकात व खंडणी देत असत.
  • 21 आता तुम्ही त्या लोकांना काम थांबवायचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होता कामा नये.
  • 22 माझा हुकूम पाळला जात आहे याची खात्री करुन घ्या. आपण यरुशलेम येथील बांधकाम चालू राहू देता कामा नये. ते चालू राहिले तर यरुशलेमकडून येणाऱ्या पैशाचा ओघ थांबेल.
  • 23 राजा अर्तहशश्तने पाठवलेल्या या पत्राची प्रत राजमंत्री रहूम, लेखक शिमशय आणि त्यांच्या बरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्या बरोबर ते सर्वजण ताबडतोब यरुशलेममधील यहूद्यांकडे गेले आणि त्यांनी सत्तीने बांधकाम थांबविले.
  • 24 त्यामुळे यरुशलेममधील मंदिराचे काम स्थगित झाले. पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले.