wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


एज्रा / Ezraधडा 3
  • 1 इस्राएल लोक आपापल्या नगरात सातव्या महिन्यांत परतले, तेव्हा एकमनाने सर्व जण यरुशलेममध्ये एकत्र आले.
  • 2 योसादाकचा मुलगा येशूवा याने शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि इतर बरोबर असलेल्या लोकांच्या सहकार्याने, होमार्पणे वाहण्यासाठी इस्राएलच्या देवाची वेदी बांधली. देवाचा एकनिष्ठ सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिचे बांधकाम झाले.
  • 3 आपल्या लगतच्या राष्ट्रातील लोकांची धास्ती वाटत असूनही तिला न जुमानता त्यांनी वेदी बांधली जुना पाया तसाच ठेवून त्यांनी त्यावर वेदी उभारली आणि तिच्यावर ते सकाळ संध्याकाळ होमार्पणे वाहू लागले.
  • 4 मग त्यांनी मोशेच्या नियमशस्त्राला अनुसरुन रोज ठराविक संख्यचे होमबली अर्पण करुन मंडपांचा सण साजरा केला.
  • 5 त्यांनंतर नित्याचे होमार्पण, नवचंद्रदिनी करायचे होमार्पण आणि परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे सणांचे आणइ दिवसांचे बळी द्यायला त्यांनी सुरुवात केली. याखेरीज लोकांनी परमेश्वराला स्वेच्छेनेही अनेक गोष्टी अर्पण केल्या.
  • 6 अशाप्रकारे, अजून मंदिर बांधून झालेले नसूनही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून इस्राएल लोकांनी परमेश्वराला होमबली वाहायला सुरुवात केली.
  • 7 बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पाथरवटांना आणि सुतारांना द्रव्य पुरवले. अन्नधान्य, द्राक्षारस आणि तेलही दिले. सोरी आणि सीदोनच्या लोकांकडून लबानोनहून गंधसरुची लाकडे मागवण्याचा मोबदला म्हणून त्यांनी या वस्तू दिल्या. शलमोनाने पहिल्यांदा हे मंदिर बांधताना आणले तसे या लोकांना हे ओंडके जलमार्गाने योफा या समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरात आणवायचे होते. या वाहतुकीला पारसचा राजा कोरेश याने परवानगी दिली.
  • 8 शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकचा मुलगा येशूवा यांनी यरुशलेमच्या मंदिरात परतल्याच्या दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. इतर याजक, लेवी हे त्यांचे बांधव व बंदिवासातून यरुशलेमला परतलेले एकूण सर्वजण त्यांच्या बरोबरीने कामाला लागले. परमेश्वराचे मंदिर बांधण्याच्या कामावर लेवींना नेमले.
  • 9 देखरेख करणाऱ्यांची नावे अशी: येशूवा आणि त्याची मुले, कदमीएल आणि त्याची मुले हे यहूदाचे वंशज, हेनादाद आणि त्याचे लेवी भाऊबंद.
  • 10 मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर याजकांनी आपला याजकीय पोषाख घातला आणि हाती कर्णे घेतले. आसाफाच्या मुलांनी झांजा घेतल्या. भजनासाठी ते आपापल्या जागी उभे राहिले. इस्राएलचा राजा दावीद याने पूर्वींच त्यांची ही व्यवस्था ठरवून दिली होती.
  • 11 ‘देवाची स्तुती करा कारण देव चांगला आहे, तो सर्वकाळ प्रेम करतो’ अशी स्तुतिगीते त्यांनी आळीपाळीनेगयिली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या आणि परमेश्वराची स्तुती केली.
  • 12 पण यावेळी वृध्द याजक, लेवी आणि घराण्या - घराण्यांतील वडीलधारी मंडळी यांना मात्र रडू आवरेना, कारण त्यांनी पूर्वीचे मंदिर बघितलेले होते. त्याच्या देखणेपणाची त्यांना आठवण झाली. नवीन मंदिर पाहून ते मोठ्याने रडले. इतर लोकांचा आनंदाने जयघोष चालू असताना या मंडळींना रडू येत होते.
  • 13 हे आवाज खूप दूरपर्यंत ऐकू जात होते. एकंदर आवाज एवढा मोठा होता की त्यातला रुदनस्वर कोणता व हर्षध्वनी कोणता हे ओळखू येत नव्हते.