wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 26
  • 1 पूर्वी अब्राहामाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्टकाळ आताही पडला; तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरात गेला.
  • 2 परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात जाऊ नकोस; तर मी सांगितलेल्या देशातच राहा;
  • 3 तू तेथे राहा आणि मी तेथे तुझ्याबरोबर असेन; मी तुला आशीर्वादित करीन; ही सर्व भूमी मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन; तुझा बाप अब्राहाम याला मी जे जे देण्याचे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.
  • 4 मी तुमची संतनी आकाशातील ताऱ्यांइतकी करीन आणि हे सर्व देश मी तुमच्या वंशजांस देईन; तुमच्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मी आशीर्वादीत करीन;
  • 5 कारण तुझा बाप अब्राहाम याने माझ्या आज्ञा, नियम व कायदे पाळले आणि मी सांगितलेल्या गोष्टी केल्या.”
  • 6 म्हणून मग इसहाक गरार नगरातच वस्ती करुन राहिला.
  • 7 इसहाकाची बायको रिबका अतिशय देखणी होती. तेथील लोकांनी रिबके विषयी इसहाकाला विचारले तेव्हा, “ती माझी बहीण आहे,” असे त्याने उत्तर दिले; “ती माझी बायको आहे.” असे सांगण्याची इसहाकाला भीती वाटली कारण रिबका मिळविण्यासाठी कोणीही त्याचा घात केला असता.
  • 8 बराच काळ तेथे राहिल्यावर एकदा खिडकीतून बाहेर पाहताना इसहाक रिबकेशी प्रेमाचे खेळ खेळण्यात रंगल्याचे अबीमलेखाला दिसले.
  • 9 तेव्हा त्याने इसहाकाला बोलावून विचारले, “ही स्त्री तुझी बायको आहे ना? मग ती तुझी बहीण आहे असे तू आम्हाला का सांगितलेस?”इसहाक म्हणाला, “मला अशी भीती वाटली की तिला मिळविण्याकरिता तुम्ही कोणीही मला मारुन टाकाल.”
  • 10 अबीमलेख म्हणाला, “तू आम्हाशी असे वागून ही वाईट गोष्ट केलीस; कारण आमच्या लोकातून कोणीही तुझ्या बायको बरोबर निजला असता आणि त्यामुळे त्याच्या माथी मोठे पाप लागून तो अपराधी ठरला असता.”
  • 11 म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांना हुकूम देऊन बजावून ठेवले; तो म्हणाला, “या माणसाला किंवा याच्या बायकोला कोणीही हात लावू नये आणी जर कोणी तसे करील तर त्याला जिवे मारण्यात येईल.”
  • 12 इसहाकाने त्या देशात धान्य पेरले; आणि त्या वर्षी त्याला भरमसाट पीक आले. परमेश्वराने त्याला भरपूर आशीर्वाद दिला.
  • 13 इसहाकाने भरपूर संपत्ती मिळवली आणि तो खूप श्रीमंत झाला;
  • 14 त्याच्याकडे शेरड्यामेंढ्यांचे कळप व गुराढोरांची खिल्लारे पुष्कळ होती; त्यावरुन पलिष्टी लोक त्याचा हेवा करु लागले;
  • 15 म्हणून त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांचाकरानी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्टी लोकांनी मातीने बुजवून सपाट केल्या;
  • 16 तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “आता तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.”
  • 17 म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या एका लहान नदीजवळ त्याने तळ दिला आणि तेथेच त्याने वस्ती केली.
  • 18 याच्या बरेच वर्षे आधी अब्राहामाने आपल्या हयातीत बऱ्याच विहिरी खणल्या होत्या; परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या; त्यामुळे इसहाकाने मागे जाऊन त्या परत खणून घेतल्या त्या विहिरींना त्याच्या वडीलांनी दिलेली नावच पुन्हा त्याने दिली.
  • 19 त्याच्या नोकरांनी एक विहीर नदीजवळ खणली; तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जीवंत पाण्याचा झरा लगला;
  • 20 परंतु गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी हुज्जत घातली; ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” त्या लोकांनी आपल्याशी त्या जागी भांडण केले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव ‘एसेक’ ठेवले.
  • 21 मग इसहाकाच्या नोकरांनी दुसरी विहीर खणली; तेथील लोकही तिच्यावरुन भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव ‘सितना’ ठेवले.
  • 22 इसहाक तेथुन पुढे गेला आणि त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा मात्र कोणीही भांडण करावयास आले नाही म्हणून इसहाकाने तिचे नाव ‘रहोबोथ’ ठेवले. इसहाक म्हणाला, “आता मात्र परमेश्वराने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे; आता या देशात आमची भरभराट होईल; आणि आम्हाला यश मिळेल.”
  • 23 तेथून इसहाक बैर - शेबा येथे गेला;
  • 24 त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “इसहाका, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे; तर भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्याकरिता तुला आशीर्वादित करीन.” आणि तुझा वंश खूप वाढवीन.
  • 25 तेव्हा इसहाकाने परमेश्वरा करिता तेथे एक वेदी बांधली व परमेश्वराची उपासना व उपकार स्तुती केली; व त्याने तेथे आपला तळ दिला; तेथेच त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.
  • 26 त्यानंतर एके दिवशी अबीमलेख राजा आपला सल्लागार अहुज्जाथ व आपला सेनापती पीकोल यांना बरोबर घेऊन गरार येथून इसहाकाला भेटावयास आला.
  • 27 इसहाकाने विचारले, “तुम्ही या अगोदर माझ्याशी मित्रासारखे वागला नाही, एवढेच नव्हे तर माझ्यावर जोर करुन तुम्ही मला तुमचा देश सोडणे भाग पाडले; मग आता माझ्याकडे का आलात?”
  • 28 त्यांनी उत्तर दिले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हाला आता पूर्णपणे समजले आहे; आम्हाला असे वाटते की आपण आता आपल्यामध्ये एक करार करावा; तू आम्हाला वचन द्यावे अशी आमची इच्छा आहे;
  • 29 आम्ही तुला त्रास दिला नाही त्याच प्रमाणे आता तुही आम्हाला त्रास देणार नाही असा तू आमच्याशी करार करावा; आम्ही तुला घालवून दिले हे खरे आहे, परंतु तुला आम्ही शांतीने जाऊ दिले; परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे.”
  • 30 तेव्हा इसहाकाने त्यांना मेजवानी दिली; त्यांनी आनंदाने भरपूर खाणे पिणे केले,
  • 31 दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्रत्येकाने वचन दिले आणि शपथ वाहिली; नंतर ते लोक शांतीने आपल्या घरी गेले.
  • 32 त्याच दिवशी इसहाकाच्या नोकरांनी येऊन त्यांनी खणलेल्या विहीरी विषयी त्याला सांगितले. ते म्हणाले, “त्या विहिरीत आम्हांस मुबलत पाणी लागले आहे;”
  • 33 तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव ‘शेबा’ ठेवले; आणि त्या नगराला अजूनही ‘बैर शेबा’ म्हटले जाते.
  • 34 एसाव चालीस वर्षांचा झाल्यावर त्याने दोन हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नांव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नांव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी;
  • 35 हेथी बायकांमुळे इसहाक व रिबका दु:खाने अस्वस्थ झाले.