wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यिर्मया धडा 29
  • 1 बाबेलमध्ये राहणाऱ्या यहूदी कैद्यांना निर्मयाने एक पत्र पाठविले. त्यांने ते पत्र वडीलधारी (नेते) याजक, संदेष्टे आणि बाबेलमध्ये राहणाऱ्या इतर सर्व लोकांना पाठविले. ह्या सर्वजणांना नबुखद्नेस्सरने यरुशलेममधून बाबेलला आणले होते.
  • 2 (राजा यकन्या, राजमाता, अधिकारी, यहूदाचे व यरुशलेमचे नेते, सुतार व लोहार ह्यांना यरुशलेममधून नेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठविले)
  • 3 सिद्कीयाने एलास व गमऱ्या यांना नबुखद्नेस्सर राजाकडे पाठविले. सिद्कीया यहूदाचा राजा होता. एलास शाफानचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा होता, यिर्मयाने, बाबेलला नेण्यासाठी, या दोघांजवळ, पत्र दिले. पत्रातील मजकूर असा होता.
  • 4 यरुशलेममधून कैद करुन ज्या लोकांना यरुशलेमहून बाबेलला नेले आहे त्या सर्व लोकांना सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे सांगतो
  • 5 “घरे बांधून त्यात राहा. तेथे वस्ती करा बागा लावा आणि तुम्ही पिकविलेले खा.
  • 6 लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका.
  • 7 मी तुम्हाला ज्या शहरांत पाठविले आहे, त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण त्या शहरात शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल.”
  • 8 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका.
  • 9 ते खोटा उपदेश करीत आहेत, व तो संदेश असून तो मी पाठविल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांना पाठविलेला नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
  • 10 परमेश्वर असे म्हणतो, “सत्तर वर्षापर्यंत बाबेल सामर्थ्यशाली राहील. त्यानंतर बाबेलमध्ये राहणाऱ्या तुम्हा लोकांकडे मी येईन. तुम्हाला यरुशलेमला परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन.
  • 11 तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो.” हा परमेश्वराचा संदेश आहे “तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दु:खविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे.
  • 12 मग तुम्ही माझा धावा कराल. माझ्याकडे याल. माझी प्रार्थना कराल. मग मी तुमच्या हाकेला ओ देईन.
  • 13 तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.
  • 14 मी स्वत:ला तुमच्याकडून सापडवून घेईल.” हा परमेश्वराचा संदेश आहे “मी तुमची कैदेतून सुटका करीन. मी तुम्हाला ही जागा सोडायला लावली आता मी तुम्हाला ज्या ज्या राष्ट्रांत आणि प्रदेशात पाठविले होते तेथून गोळा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “आणि जेथून तुम्हाला मी कैदी म्हणून पकडून दूर नेण्यास भाग पाडले होते त्या जागी परत आणीन.”
  • 15 “आम्हाला बाबेलमध्ये परमेश्वराने संदेष्टे दिले असे कदाचित् तुम्ही म्हणू शकाल.”
  • 16 पण बाबेलमध्ये ज्यांना आणले गेले नाही, त्या तुमच्या आप्तांविषयी परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. ह्या गोष्टी दावीदाच्या सिंहासनावर आता बसलेल्या राजासाठी व यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांसाठी आहेत.
  • 17 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांविरुद्ध मी लढाई उपासमार व रोगराई या आपत्ती पाठवीन. मी त्यांची स्थिती, खाण्यास अयोग्य असलेल्या नासक्या अंजिरासारखी करीन.
  • 18 मी अजूनही यरुशलेममध्ये राहत असलेल्या लोकांचा लढाई, उपासमार व भयंकर रोगराई ह्यांनी पाठपुरावा करीन. ह्यामुळे लोकांची जी स्थिती होईल ती जगातील राज्यांचा भीतीने थरकाप उडवेल. ज्या राष्ट्रांत जायला त्यांना मी भाग पाडीन, तेथे तेथे त्यांच्याकडे एक शाप म्हणून पाहिले जाईल. ह्या लोकांची स्थिती पाहून ते विस्मयाने सुस्करे सोडतील.
  • 19 यरुशलेममधील लोकांनी माझे ऐकले नाही, म्हणून मी असे घडवून आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे “मी माझा संदेश पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाठविला. माझा संदेश देण्यासाठी मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्या लोकांनी ऐकले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
  • 20 “तुम्ही कैदी आहात. मी तुम्हाला बळजबरीने यरुशलेम सोडायला लावले व बाबेलला पाठविले. म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका.”
  • 21 कोयालाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया यांच्याविषयी सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “ह्या दोघांनी तुम्हाला खोटा संदेश दिला आहे व तो संदेश माझ्याकडून आला असे त्यांनी सांगितले. पण ते खोटे बोलले. मी त्या दोघा संदेष्ट्यांना, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन आणि बाबेलचे कैदी असलेल्या तुम्हा सर्व लोकांसमोर तो त्यांना ठार करील
  • 22 यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’
  • 23 त्या दोघा संदेष्ट्यांनी इस्राएलमध्ये फार वाईट कृत्ये केली. शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर त्यांनी व्यभिचार केला. त्यांनी खोटे सांगितले आणि माझा संदेश खोटे असल्याचे लोकांना सांगितले मी त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या त्यांनी काय केले आहे, ते मला माहीत आहे मी त्याला साक्षी आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
  • 24 शमायालासुद्धा संदेश दे. शमाया नेहेलमी घराण्यातील आहे.
  • 25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “शमाया, तू यरुशलेममधील सर्व लोकांना पत्रे पाठविलीस. मासेयाचा मुलगा याजक सफन्या ह्यासही तू पत्रे पाठविलीस. तू सर्व याजकांनाही पत्रे पाठविलीस. परमेश्वराची परवानगी न घेता, स्वत:च्या नावाने तू पत्रे पाठविलीस.
  • 26 शमाया, सफन्याला पाठविलेल्या पत्रात तू असे लिहितोस ‘सफन्या, परमेश्वराने तुला यहोयदाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. परमेश्वराच्या मंदिराचा तू उत्तराधिकारी आहेस. जो कोणी वेड्याप्रमाणे वागेल, वा संदेष्टा असल्याचे भासवेल, त्याला तू अटक करावेस. तू त्या माणसाचे पाय लाकडाच्या खोड्यात अडकवून त्याच्या गळ्यात लोखंडाची बेडी घालावी.
  • 27 हल्ली यिर्मया आपण संदेष्टा असल्याचे दाखवीत आहे. मग तू त्याला अटक का केले नाहीस?
  • 28 यिर्मयाने बाबेलमध्ये आम्हाला असा संदेश पाठविला “तुम्हाला बाबेलमध्ये बराच काळ राहावे लागेल, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व स्वत: पिकविलेले खा.”
  • 29 याजक सफन्याने हे पत्र संदेष्टा यिर्मयाला वाचून दाखविले.”‘
  • 30 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा:
  • 31 “यिर्मया, बाबेलमध्ये असलेल्या सर्व कैद्यांना पुढील निरोप पाठव नेहेलमी घराण्यातील शमाया ह्या माणसाबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘शमायाने तुम्हाला उपदेश केला. पण मी त्याला पाठविलेले नाही. शमायाने तुम्हाला खोटे सांगून त्यावर विश्वास ठेवायला लावले.
  • 32 शमाया असे वागला म्हणून परमेश्वर म्हणतो की मी नेहेलमी घराण्यातील शमायाला लवकरच शिक्षा करीन. मी त्याच्या घराण्याचा सर्वनाश करीन. मी माझ्या लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी करीन, त्यात त्याचा वाटा असणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे “शमायाने लोकांना परमेश्वराविरुद्ध पढविले म्हणून मी त्याला शिक्षा करीन.”