wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यिर्मया धडा 30
  • 1 यिर्मयाला परमेश्वराकडून पुढील संदेश आला.
  • 2 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणाला, “मी तुझ्याशी बोललेले शब्द ग्रंथात लिहून ठेव. ते तुझ्यासाठी लिहून ठेव.
  • 3 असे करण्याचे कारण असा काळ येईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “तेव्हा मी इस्राएल आणि यहूदा येथील माझ्या हद्दपार केलेल्या लोकांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत मी त्यांना परत वस्ती करु देईन. मग ती भूमी पुन्हा त्यांच्या मालकीची होईल.”
  • 4 इस्राएल व यहूदा येथील लोकांबद्दल परमेश्वराने हा संदेश दिला.
  • 5 परमेश्वर म्हणाला,“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते. लोक घाबरले आहेत. कोठेही शांती नाही.
  • 6 “पुढील प्रश्न विचारा व त्यांचा विचार करा. पुरुषाला मूल होऊ शकेल का? अर्थात् नाही मग प्रत्येक पुरुष प्रसूतिवेदना होणाऱ्या बाई प्रमाणे पोट धरताना का दिसत आहे? प्रत्येकाचा चेहरा मृताप्रमाणे पांढराफटक का पडला आहे? का? कारण ते फार घाबरले आहेत.
  • 7 “याकोबाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा काळ आहे. हा अतिशय संकटाचा काळ आहे. पुन्हा असा काळ कधीच येणार नाही. पण याकोबाचे रक्षण होईल.
  • 8 “त्या वेळी,” हा सर्वशक्तिमान परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल व यहूदा ह्यांच्यामधील लोकांच्या मानेवरील जोखड तोडीन. तुमची बंधने तोडीन. परक्या देशातील लोक पुन्हा माझ्या माणसांना गुलाम होण्यास भाग पाडणार नाहीत.
  • 9 इस्राएल आणि यहूदा यांच्यामधील लोक परक्या देशांची सेवा करणार नाहीत. नाही! ते परमेश्वराची, त्यांच्या देवाची सेवा करतील. मी त्यांच्यासाठी पाठवणार असलेल्या त्याच्या दावीद राजाचीही ते सेवा करतील.
  • 10 “तेव्हा, याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस,” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “इस्राएल, भीऊ नकोस मी त्या दूरच्या ठिकाणाहून तुझे रक्षण करीन. तुम्ही त्या दूरच्या प्रदेशात कैदी आहात. पण मी तुमच्या वंशजांना वाचवीन. मी त्यांना तेथून परत आणीन. याकोबला पुन्हा शांती लाभेल. लोक त्याला त्रास देणार नाहीत. माझ्या माणसांना घाबरविणारा कोणीही शत्रू नसेल.
  • 11 इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी तुमचे रक्षण करीन. मी तुम्हाला त्या राष्ट्रांमध्ये पाठविले. पण त्या सर्व राष्ट्रांचा मी नाश करीन. खरंच! मी त्या राष्ट्रांचा नाश करीन. पण मी तुमचा नाश करणार नाही. तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे. पण मी न्याय्यबुद्धीने तुम्हाला शिक्षा करीन.”
  • 12 परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे, कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे.
  • 13 तुमच्या व्रणांची काळजी घेणारा कोणीही नाही, म्हणून तुम्ही बरे होणार नाही.
  • 14 तुम्ही बऱ्याच राष्ट्रांचे मित्र झालात पण ती राष्ट्रे तुमची पर्वा करीत नाहीत. तुमचे ‘मित्र’ तुम्हाला विसरले आहेत. मी शत्रूला दुखवावे, तसे तुम्हाला दुखविले आहे. मी तुम्हाला कडक शिक्षा केली. तुमच्या भयंकर अपराधांसाठी मी हे केले. तुम्ही खूप पापे केलीत, म्हणून मी असे केले.
  • 15 इस्राएल आणि यहूदा, तुमच्या जखमेबद्दल तुम्ही आरडाओरड का करता? तुमची जखम यातना देणारी आहे. पण त्यावर काही इलाज नाही. मी, परमेश्वराने, तुमच्या भयंकर अपराधांबद्दल ह्या गोष्टी घडवून आणल्या. तुमची पापे खूप वाढली. म्हणून मी असे केले.
  • 16 त्या राष्ट्रांनी तुमचा नाश केला. पण आता त्या राष्ट्रांचा नाश केला जाईल. इस्राएल व यहूदा, तुमच्या शत्रूंना कैद केले जाईल. त्या लोकांनी तुमच्या वस्तू चोरल्या. पण आता दुसरे लोक त्यांच्या वस्तू चोरतील. युद्धात त्यांनी तुम्हाला लुटले. आता लढाईत इतर लोक त्यांना लुटतील.
  • 17 मी तुम्हाला पुन्हा तंदुरस्त करीन. तुमच्या जखमा मी बऱ्या करीन. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस. ते म्हणतात, सियोनची काळजी करणारे कोणीही नाही.”
  • 18 परमेश्वर म्हणतो, “सध्या याकोबाची माणसे बंदिवासात आहेत. पण ती परत येतील. याकोबाच्या घरांची मला दया येईल. सध्या नगरी म्हणजे पडक्या इमारतींनी भरलेली टेकडी आहे. पण नगरी पुन्हा बांधली जाईल. राजाचा राजवाडाही योग्य जागी बांधला जाईल.
  • 19 “तेथील लोक स्तुतिस्तोत्रे गातील. तेथे हास्याच्या लहरी उठतील. त्यांना मी पुष्कळ संतती देईन इस्राएल व यहूदा यांचा आकार लहान राहणार नाही मी त्यांना मान मिळवून देईन. कोणीही त्यांना खाली पाहणार नाही.
  • 20 “याकोबाचे घराणे पूर्वीच्या इस्राएलच्या घराण्याप्रमाणे होईल. मी, इस्राएल आणि यहूदा, यांना सामर्थ्यशाली करीन आणि त्यांना इजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन.
  • 21 त्यांच्यातीलच एक त्यांचे नेतृत्व करील. तो माझ्या माणसांपैकीच एक असेल. मी सांगितल्यावरच लोक माझ्याजवळ येऊ शकतील. मग मी त्या नेत्याला माझ्याजवळ यायला सांगीन आणि तो माझ्याजवळ येईल. तो मला जवळचा होईल.
  • 22 तुम्ही लोक माझे व्हाल आणि ती तुमचा देव होईन.”
  • 23 “परमेश्वर खूप रागावला होता. त्याने लोकांना शिक्षा केली. शिक्षा वादळाप्रमाणे आली. त्या दुष्ट माणसांविरुद्ध शिक्षा तुफानाप्रमाणे आली.
  • 24 लोकांची शिक्षा पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग राहील. परमेश्वराने ठरविलेली शिक्षा पूर्ण होईपर्यंत तो शांत होणार नाही. यहूदाच्या लोकांनो, तो दिवस उजाडल्यावरच तुम्हाला हे समजेल.”