wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यिर्मया धडा 40
  • 1 यिर्मयाची रामा येथे, सुटका झाल्यावर परमेश्वराकडून संदेश आला. बाबेलच्या राजाच्या खास सैनिकांचा प्रमुख नबूजरदान ह्याला रामा शहरात यिर्मया सापडला. यिर्मयाला बेड्या घातल्या होत्या. यरुशलेम व यहूदा येथील सर्व कैद्यांबरोबरच तो होता. त्या सर्वांना कैद करुन बाबेलला नेले होते.
  • 2 नबूजरदानला यिर्मया सापडताच, तो त्याच्याशी बोलला तो म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराने, तुझ्या देवानेच हे अरिष्ट ह्या स्थळी येणार म्हणून भाकीत केले होते.
  • 3 आणि आता परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच सर्व घडले आहे. तुम्ही यहूदातील लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केल्यानेच हे अरिष्ट आले. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही.
  • 4 यिर्मया, आता मी तुझी सुटका करीन. मी तुझ्या बेड्या काढतो तुझी इच्छा असल्यास तू माझ्याबरोबर बाबेलला ये. मी तुझी चांगली काळजी घेईन. पण, तुझी इच्छा नसल्यास, तू माझ्याबरोबर येऊ नको. सर्व देश तुझ्यापुढे मोकळा आहे तुला पाहिजे तेथे जा.
  • 5 किंवा शाफानपुत्र अहीकाम याचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे परत जा. बाबेलच्या राजाने त्याला यहूदातील शहरांचा राज्यपाल म्हणून नेमले आहे. परत जा आणि गदल्याबरोबर लोकांमध्ये राहा. नाहीतर तुला पाहिजे तेथे तू जा.”नंतर नबूजरदानने त्याला अन्न व बक्षीस देऊन सोडून दिले.
  • 6 मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो गदल्याबरोबर यहूदात मागे राहिलेल्या लोकांमध्ये राहिला.
  • 7 यरुशलेमचा नाश झाला तेव्हा यहूदाच्या सैन्यातील काही सैनिक, अधिकारी आणि त्यांची काही माणसे रानात राहात होती. बाबेलच्या राजाने अहीकामचा मुलगा गदल्या ह्यास, मागे राहिलेल्या लोकांचा अधिपती म्हणून नेमले आहे, हे त्यांना कळले. अगदी गरीब स्त्री पुरुष व मुले ह्यांना कैद करुन बाबेलला नेले नव्हते हे लोक मागेच राहिले होते.
  • 8 मग ते सैनिक मिस्पा येथे गदल्याकडे आले. ते सैनिक म्हणजे नथन्याचा मुलगा इश्माएल, कारेहाचा मुलगा योहानान व त्याचा भाऊ योनाथान तान्हुमेथचा मुलगा सराया, नटोफाथी एफै याचे मुलगे, माकाथाचा मुलगा याजन्या व ह्यांच्याबरोबरचे काही लोक होत.
  • 9 शाफनाचा मुलगा अहीकाम व अहीकामचा मुलगा गदल्या ह्या गदल्याने त्या सैनिकांना अधिक सुरक्षित वाटेल असे करण्याची शपथ घेतली. गदल्या त्यांना म्हणाला “खास्द्यांची सेवा करण्यास तुम्ही घाबरु नका. (इस्राएलमध्ये) देशात वस्ती करा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा. असे केल्याने तुमचे भले होईल.
  • 10 मी स्वत: मिस्पात राहीन. मी येथे येणाऱ्या खास्द्यांशी तुमच्यावतीने बोलीन. तुम्ही हे काम माझ्यावर सोपवा. तुम्ही द्राक्षरस, ग्रीष्मातील फळे व तेल यांचे उत्पादन करुन रांजणात साठवून ठेवावे तुम्ही ताबा मिळविलेल्या शहरात तुम्ही राहा.”
  • 11 बाबेलच्या राजाने यहूदातील काही लोकांना त्यांच्या स्वत:च्या देशात राहू दिले आहे हे मवाब, अम्मोन, अदोम व इतर देशात राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांना समजले. ह्या मागे राहिलेल्या लोकांसाठी शाफानपुत्र अहीकाम याचा मुलगा गदल्या ह्यास बाबेलच्या राजाने, राज्यपाल म्हणून नेमले असल्याचेही त्यांना कळले.
  • 12 ही बातमी कळताच यहूदाचे लोक यहूदात परतले ते सर्व ज्या ज्या देशांत पसरले गेले होते, तेथून ते गदल्याकडे मिस्पाला परतले, ते परत आले व त्यांनी द्राक्षरस व ग्रीष्मातील फळे यांचा पुष्कळ साठा केला.
  • 13 कारेहाचा मुलगा योहानान व अजूनही रानात राहात असलेले यहूदाच्या सैन्यातील सर्व अधिकारी गदल्याकडे आले. गदल्या मिस्पामध्ये होता.
  • 14 योहानान व त्याच्या बरोबरचे आधिकारी गदल्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बआलीस ह्याला तुला ठार मारायचे आहे, हे तुला माहीत आहे का? त्याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे” पण अहीकामचा मुलगा गदल्या ह्याचा ह्यावर विश्वास बसला नाही.
  • 15 मग मिस्पा येथे, एकांतात कारेहाचा मुलगा योहानान हा गदल्याशी बोलला तो गदल्याला म्हणाला, “मी नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला मारतो तू मला परवानगी दे. ही गोष्ट कोणालाही कळणार नाही. इश्माएल तुला मारणार आहे, पण आम्ही त्याला तसे करु देणार नाही. कारण तसे झाल्यास तुझ्याभोवती गोळा झालेल्या सर्व यहूदी लोकांना पुन्हा इतर देशात पांगावे लागेल. ह्याचाच अर्थ यहूदाचे उरलेले थोडे शिल्लक राहणार नाही.”
  • 16 पण अहीकामचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला “इश्माएलला मारु नको, तू त्याच्याबद्दल जे सांगत आहेस ते खरे नाही.”